

भंडारा प्रतिनिधी/ जवाहरनगर: कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप, जवाहरनगर येथील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नलिनी बोरकर यांना नागपूर येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय संशोधन ग्रंथ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नलिनी बोरकर यांनी
डॉ. प्रदीप आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी संपूर्ण विदर्भात “बौद्धांच्या सामाजिक जाणीवा’ या विषयावर संशोधन केले. या संशोधनावर आधारित त्यांचा ग्रंथ नागपूरच्या प्रतिष्ठीत साईनाथ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. बौद्धांच्या सामाजिक जाणिवांचे चिकित्सक विश्लेषण डॉ. नलिनी बोरकर यांनी सदर ग्रंथात केले असून त्यासाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी कळविले आहे.
डॉ. नलिनी बोरकर यांना सदर पुरस्कार ३१ मार्च २०२४ रोजी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ३१ मार्च रोजी सीताबर्डी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक व सुप्रसिद्ध नाटककार डॉ. सुनील रामटेके, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. विद्याधर बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या या प्रतिष्टेच्या पुरस्कारासाठी डॉ. नलिनी बोरकर यांचे डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. जगन कराडे, डॉ. राहुल भगत, डॉ. दीपक पवार, डॉ. नारायण कांबळे, डॉ. राजकुमार भगत, डॉ. प्रदीप गजभिये, प्रा. विनोद शेंडे, प्रा. सुनंदा भैसारे, प्रा. मोनाली बहादुरे, प्रा. राहुल मून, आदींनी अभिनंदन केले आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663