
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर, शहरातील शिवनगर परिसरातील एका जुगार अड्ड्यावर रात्रीच्या सुमारास उपविभागीय पोलिसांनी धाड घालून चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ९२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भूषण प्रकाश मोहनकर, जीवतराम सुदन हलमारे, रामरतन प्रल्हाद अग्रवाल, शेखर ऊर्फ सोनू प्रल्हाद अग्रवाल अशी आरोपींची नावे आहेत. शेखर ऊर्फ सोनू अग्रवाल हा जुगार व्यवसायाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने या व्यवसायासाठी रामरतन अग्रवाल यांच्या घराचा वापर केला होता. भूषण मोहनकर आणि जीवतराम हलमारे हे दरमहा १० हजार रुपये पगारावर सट्टा आकडे लिहिणे, पट्ट्या संकलित करणे आणि प्रिंटरद्वारे पट्ट्या छापणे यासाठी काम करीत होते. ही यंत्रणा संगणकीकरण, मोबाईल, प्रिंटर व कागदपत्रांच्या आधारे चालविली जात होती. पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपन्याचे मोबाईल प्रिंटर, कॅल्क्युलेटर, सट्टा आकडे लिहिलेले कागद, हिशेब रजिस्टर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या फिर्यादीवरून तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुधे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार भोंडकेर, अंमलदार रवी आडे, विक्रम आस्वले, गजानन ठाकरे आदींनी पार पाडली.





Total Users : 879218
Total views : 6482663