
तुमसर :रामटेक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात माकडांवर होणाऱ्या अमानुष वर्तनाविरोधात लालू आर. हिसारिया (तुमसर, जिल्हा भंडारा) यांनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मंदिर परिसरात अनेक माकडांचे हात-पाय मोडलेले, जखमी अवस्थेत आढळले. अंदाजे २५% माकडांना गंभीर इजा झाल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. यामागचे कारण शोधले असता, मंदिर परिसरातील काही दुकानदार माकडांनी खाऊ किंवा वस्तू उचलल्यास त्यांना काठ्यांनी निर्दयपणे मारत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे माकडांच्या हातपायांना गंभीर दुखापत होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.”श्रीरामाचे मंदिर हे माकडांचेच स्थान आहे, येथे जर त्यांच्यावर अत्याचार होणार असेल तर ते दुसीकडे कुठे जातील?” असा भावनिक सवाल करत हिसारिया यांनी मंदिर प्रशासन आणि व्यवस्थापन समितीवर दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे.
मंदिर परिसर हे एक सुंदर पर्यटन स्थळ असून माकडदेखील त्याचा भाग आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तर या निवेदनाची प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पशु संवर्धन मंत्री पंकजा मुंडे, उपविभागीय अधिकारी रामटेके यांना दिली आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663