
तुमसर: शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शारदा शाळेजवळील मुख्य सिमेंट रस्ता सध्या एका कबाडी व्यवसायाच्या ताब्यात गेला असल्याची चर्चा नागरिकांत आहे. रस्त्यालगत वेल्डिंग व लोहकाटणीचे कामे सारखे सुरू असून शाळा परिसरातील विद्यार्थ्यांना व पालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्याने शाळेत ये-जा करतात. मात्र रस्त्यावरच उभे असलेले ट्रक, लोखंडी साहित्य आणि मोठ्या मशीनमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका कायमचा वाढला आहे.
कबाडीवर चोरीच्या मालाचा आरोप! स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे की, या कबाडी दुकानात चोरीचा माल सर्रासपणे विकत घेतला जातो. विशेष म्हणजे पोलिसांचे या सगळ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरमहा पोलिसांना ‘मंथली’ दिली जाते, त्यामुळेच कारवाई होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
वाहतूक शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह मुख्य सिमेंट रस्त्यावर असा बेकायदेशीर व्यवसाय निर्भीडपणे सुरू असताना वाहतूक शाखा व पोलिस प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक रस्त्यावर खासगी व्यवसायाचा कब्जा कसा काय सुरू राहू शकतो, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
रस्त्याचे सार्वजनिकत्व राखा – नागरिकांची मागणी रस्ता हा सर्वसामान्यांचा हक्क असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शाळा परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी हा कबाडी व्यवसाय तत्काळ हटवण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. तो पर्यंत वाहनचालक व पादचाऱ्यांनी या मार्गावरून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.






Total Users : 879218
Total views : 6482663