
मोहाडी : निलज (खुर्द) येथील रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या पाणंद रस्त्यांच्या कामात अनियमितता झाली, गैरप्रकारही झाला. त्याबद्दल तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहनाच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना सोमवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास मोहाडी पोलिसांनी पंचायत समिती परिसरातून ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यातच या तक्रारकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्यामुळे पोलिसही अलर्ट असल्याने अनुचित प्रकार टळला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये दुधराम भैया बांते (५६), जयप्रकाश नामदेव (३८), हिरादास जयराम भोयर (२९), संदीप सुखदेव उके (३५), दिगंबर तुमराम माने (६०) यांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून पेट्रोलच्या बाटल्या, आगपेटीची डबी जप्त करण्यात आली. त्यांना पोलिस स्टेशन मोहाडी आणून महाराष्ट्र पोलिस कायदा ६८ अंतर्गत कारवाई केली. रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामातील गैरप्रकाराच्या निषेधार्थ हे पाऊल उचलले होते.
अधिकारी आले परत: शुक्रवारी गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे व दोन विस्तार अधिकारी निलज खुर्द येथे कामाच्या ठिकाणी गेले होते. तक्रारकर्ते व गावकऱ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्तही लावला होता. परंतु या कामाची चौकशी जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे चौकशीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे रिकामे परतावे लागले.





Total Users : 879784
Total views : 6483690