

तुमसर: शहरात सेव डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी आई-बाबाची’ या अनोख्या उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजाराम लॉन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या उपक्रमातून कन्येसह त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करून मुलींचे स्थान अधोरेखित केले जाते.मागील वर्षी १४६ कुटुंबांचा गौरव करण्यात आला होता, तर यावर्षीही १२९ लेकी व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करून कुटुंबप्रेम, नातेसंबंध व लिंगसमतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि कौतुकाच्या शब्दांनी सजलेला हा सोहळा उपस्थितांवर अमिट ठसा उमटवून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजिता कारेमोरे होत्या. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी मुलीच्या जन्मापासून शिक्षण व विवाहानंतर समाजात भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. समाज व पालकांनी मिळून मुलींसाठी सकारात्मक वातावरण तयार केल्यासच खऱ्या अर्थाने समाज प्रगतिशील होईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.या सोहळ्यास आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, डॉ. सुधा भुरे, किशोर चौधरी,रावसाहेब मेश्राम, डॉ.शेखर चोपकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्वच मान्यवरांनी ‘लेक लाडकी आई-बापाची’ या उपक्रमाचे कौतुक करताना मुलींना समान संधी दिल्यास देश-समाजाची प्रगती दुणावेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन सचिव अनिल कारेमोरे यांनी केले. सेव डॉटर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गभणे व त्यांच्या टीमने संपूर्ण ताकदीने मेहनत घेत हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी केला.लेक लाडकी आई-बाबाची’ हा उपक्रम तुमसरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातील समाजासाठी आदर्शवत ठरत असून, लेकीच्या सन्मानातून कुटुंबनिष्ठा आणि लिंगसमतेचा नवा संदेश देत आहे.





Total Users : 879218
Total views : 6482663