
तुमसर: नगर परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची शिक्षण परिषद आज दुपारी २ वाजता शारदा विद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परिषदेचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती तुमसर गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे – भिवगडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक राहुल डोंगरे व मुख्याध्यापक पंकज बोरकर यांची उपस्थिती लाभली. शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी अतिथींचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.
या परिषदेत नगरपरिषद क्षेत्रातील इयत्ता १ ते ४ ला शिकवणारे सर्व शिक्षक तसेच इयत्ता ५ ते ८ मधील ५० टक्के शिक्षक सहभागी झाले होते. परिषदेचे संचालन सेवकराम शरणागत यांनी केले तर आभारप्रदर्शन अशोक खंगार यांनी मानले. परिषदेअंतर्गत विविध शैक्षणिक, प्रशासकीय व योजनात्मक विषयांवर मार्गदर्शन झाले. विद्यार्थी लाभाच्या विविध योजना या विषयावर श्री. सेवकराम शरणागत यांनी सविस्तर माहिती दिली. निपुण भारत या विषयावर श्री. प्रकाश राऊत यांनी प्रभावी विवेचन केले. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयावर मंगला खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले. UDISE व PGI या विषयावर श्री. रामरतन भाजीपाले (MIS Co.) यांनी तपशीलवार माहिती दिली. शालेय पोषण आहार योजना (MDM) या विषयावर श्री. टेकलाल पुष्पतोडे (ADI) यांनी आपले विचार मांडले. माता-पालक गट व मानव विकास या विषयावर सौ.संगीता भवसागर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. NILP या विषयावर मेघेश्वरी बिसेन यांनी विवेचन केले, तर ‘एक पेड माँ के नाम’ व SHVR या उपक्रमांबाबत उज्ज्वला बावनकर यांनी माहिती दिली.
शिक्षण परिषदेत शिक्षकांच्या कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांवर भर देण्यात आला. त्याचबरोबर शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती रजिस्टर, विविध समित्यांचे रजिस्टर, अभ्यागत रजिस्टर व UDISE+ हार्ड कॉपी तपासण्यात आली.
संपूर्ण परिषदेत शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मार्गदर्शक विषयांवर चर्चा केली. गटशिक्षणाधिकारी सौ. अर्चना माटे – यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन केले.





Total Users : 879218
Total views : 6482663