![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती आहे.त्याचप्रमाणे भारत कृषीप्रधान देश आहे.त्यामुळे संपूर्ण शेतीतील कामे बैलांच्याच मदतीने केली जात होती आणि आताही जातात.त्यामुळे भारतात आपल्याला वेगवेगळे सण उत्सव पहायला मिळतात. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानल्या जातो.कारण पुर्वी संपूर्ण कामे बैलांच्याच मदतीने व्हायची व बैल बीना संपूर्ण कामे अधुरी रहायची.श्रावण महिन्यातील अमावस्येला हा सण उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलांची पूजा अर्चना करून साजरा करतात.या सणाला पिठोरी अमावस्या,मोठा पोळा किंवा बैलपोळा असेही म्हणतात.या दिवशी संपूर्ण परिवार बैलांच्या सेवेत असतात.बैलपोळ्याला शेतकरी दिवाळीसारखा सण साजरा करतात.त्या दिवशी बैलांपासुन कोणतेही काम करून घेतले जात नाही व बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो.या सणाची सुरूवात बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर सुरूवात होते.बैलपोळ्याच्या एकदिवस अगोदर मातीचे बैल बनवून त्याची पुजाअर्चना केली जाते व त्यांना नैवेद्य केला जातो.त्याच दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर बैलांची पुजा केली जाते त्याला खांदशेकणी असे म्हणतात.कारण वर्षभर बैलांना शेतकरी राबवितो अशा परिस्थितीत त्यांच्या खांद्याला अनेक जखमा होतात.म्हणुनच म्हणतात “कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर” अशी जी म्हण आहे ती सत्य आहे.देशातील करोडो लोकांना अन्न पुरवठा व्हावा या उद्देशाने शेतकऱ्यांना बैलांपासुन काम करून घ्यावे लागते. बैलाला वर्षभर यातना भोगाव्या लागतात.तेव्हाच देशातील करोडो लोकांना अन्नधान्य मिळते.कारण वर्षभर नांगर,वखर,बंडीचे जु त्यांच्या खांद्यावर सतत असते.अशाप्रकारे वर्षेभर शेतात राबराब राबतात.परंतु बैलपोळ्याच्या एक दिवस अगोदर त्यांची आंघोळ करून त्यांच्या खांद्यावरील जखमांवर हळद लावून त्यांना दिलासा देतात.त्यालाच खांदशेकणी असे म्हणतात.खांदशेकनीच्या दिवशी प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना आमंत्रण (आवतन) देतांना म्हणतात “आज आवतन घ्या उद्या जेवायला या”ज्याप्रमाणे लग्नाकरीता नवरदेवाला सजविल्या जाते व अगोदरच्या दिवशी हळद लावल्या जाते त्याचप्रमाणे बैलाला हळद लावून दुसऱ्या दिवशी सजवून बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची आंघोळ करून नीटनेटक्या पध्दतीने बैलांची सजावट करून ढोलताशेरे वाजवुन वाजत-गाजत, नाचत-कुदत बैलांना पोळ्याच्या ठिकाणी एकत्र आणले जाते व प्रत्येक गावागावात किंवा शहरात महत्वाच्या ठिकाणी संपूर्ण बैल एकत्र होतात व संपूर्ण शेतकरी एकमेकांना आलिंगन घालून बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतात.या दिवशी बैल किंवा शेतमजूर यांच्या कामाला पुर्णतः सुट्टी असते.जो बैल वर्षभर शेतात राबतो आणि आपल्यासाठी कष्ट करतो त्याला फक्त बैलपोळ्याच्या दिवशीच विश्रांती मिळते.यानंतर दुसऱ्याचं दिवशी तान्ह्या पोळा येतो या दिवशी लाकडाचे बैल सजवुन पोळ्यामध्ये नेण्यात येते व संपूर्ण बालगोपाल तान्ह्या पोळ्यांचा आनंद लुटतात व बैल घरोघरी घेऊन जातात आणि त्याची पुजाअर्चना केली जाते व बालगोपालांना पैसे किंवा भेट वस्तू देऊन त्यांचा आनंद व्दिगुणित केला जातो.अशा प्रकारे मोठ्या व्यक्तींपासुन तर बालगोपालांपर्यंत सर्वच बैलपोळ्याचा व तान्ह्या पोळ्याचा आनंद घेतांना दिसतात.अशा प्रकारे भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांना आगळेवेगळे महत्व आपल्याला दिसून येते सर्वच यात सहभागी होतात.जो व्यक्ती किंवा शेतकरी बैलांना पोळ्यात घेऊन जातो त्याचाही मानसन्मान केला जातो.अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या व प्रत्येक कामात सोबत तत्परतेने काम करणारा, धान्यासाठी वर्षभर कष्ट करणारा शेतकऱ्यांचा खरा सोबती,सखा जिवलग मित्र म्हणजे बैल.त्यामुळे बैलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे.शेतकरी आपल्या पध्दतीने कष्ट करून शेती पिकवितात व संपूर्ण शेत हिरवागार गालिचाच्या रूपात आपल्याला दिसुन येते.त्यामुळे सर्वसामान्यांना, सामाजिक संस्थांना व सरकारला विनंती आहे की पोळ्याचे औचित्य साधून वृक्षारोपण केले पाहिजे.कारण शेतकऱ्यांना ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ यांचा नेहमीच सामना करावा लागतो.त्यावर फुंकर घालण्यासाठी वृक्षलागवड अत्यंत आवश्यक आहे.यामुळे गुरांना चारा व सर्वांना शुध्द हवा सुध्दा मिळण्यास मोठी मदत होईल व सृष्टी प्रफुल्लित राहील.बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!जय जवान जय किसान!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.