



प्रतिनिीधी/भंडारा: कर्जमाफी योजनेचा लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यांत यावी अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सन 2017 मध्ये छत्रापती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली यामध्ये 32079 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. 134.89 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाला पाठविल्यानंतरही ही रक्कम थकीत आहे. सन 2019 मध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, मात्रा यात 577 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेतून 338 लाभार्थी वंचित आहेत. 2017 ते 2019 या काळात विविध योजनांपासून वंचित शेतकऱ्यांची माहिती शासनाला कळविण्यात आली असल्याचेही निवदेनात नमुद करण्यात आले. यासंदर्भात सकारात्मक निर्णय तातडीने घेण्याचे निर्देश संबंधीत यंत्राणांना देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगीतले.
यासोबतच मागील सहा महिन्यांपासून जिल्हयातील धान उत्पादक शेतकरी अतिवृष्टी, महापुर, रोगकिडींचा प्रादुर्भाव व अवकाळी पाऊस यामुळे अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करीत आहे. वेळोवेळी प्रशासनातर्फे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला मिळालेला नाही. नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे 10826.89 हेक्टर क्षेत्रात रोग किडींच्या प्रादुर्भावाने प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये भंडारा तालुक्यातील 8239 तर पवनी तालुक्यातील 2305 हेक्टर शेतीचा समावेश आहे. दिनांक 15 व 16 सप्टेंबर 2023 ला गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे एकटया पवनी तालुक्यात 2024 शेतकऱ्यांचे 10133 हेक्टर मधील धानपिक नष्ट झाले. अशा विविध संकटांचा शेतकरी सामना करीत असतांना 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले असून तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देवून पंचनामे करण्याची व नुकसान भरपाईची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्य मंत्र्यांकडे केली आहे.