![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर : आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट गणल्या जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेर(रायगड) विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा २०१८ मध्ये इटली येथे यंग सायंटिस्ट म्हणून निवड झालेले शास्त्रज्ञ डॉ. संजय खोब्रागडे यांनी तुमसर शहरात विद्यार्थ्याना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षण याबाबत मोलाचे मार्गदर्शन करावे या करीता माजी नगराध्यक्ष तथा अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप पडोळे यांनी एक दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे विशेष आयोजन केले. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांकरीता तत्परतेने कार्य करणाऱ्या ट्रस्टमार्फत १७ ऑगस्ट रोजी सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात शहरातील अनेक शालेय संस्थेतून शेकडो विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने हजेरी लावून शास्त्रज्ञ डॉ. संजय खोब्रागडे यांचे मार्गदर्शन आत्मसाद केले. बदलत्या जगात स्पर्धेला महत्त्व आहे. ती स्पर्धा जगण्याची असो की शिक्षणाची; त्याला पर्याय नाही. म्हणून शिक्षणाची कास न सोडता प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत टिकाव धरावा. तसे करताना नेमक्या कोणत्या बाबी ध्यानात घेणे आवश्यक आहेत, पारंपरिक शिक्षणा व्यतिरिक्त तांत्रिक तथा वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या इतर शाखा कसे निवडावे, त्यातून परदेशी उच्च शिक्षण, त्याकरिता शासकीय शिष्यवृत्ती, स्वयंसेवी संस्थेमार्फत मिळणाऱ्या स्कॉलरशिप कश्या प्राप्त केल्या जाऊ शकतात यावर डॉ.खोब्रागडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर चलचित्राद्वारे मार्गदर्शन केले. त्यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रदीप पडोळे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, विविध शाळेचे शिक्षक वृंद, दीपस्तंभ बहु उद्देशिय संस्थेचे पदाधिकारी तथा मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
स्वप्नांना परिस्थितीच्या मर्यादा नसतात : डॉ खोब्रागडे
विद्यार्थी दशेतच स्वप्नांना बहुआयामी प्रयत्नांची साथ मिळते. तर स्वप्नांना परिस्थितीच्या मर्यादा नसतात. आपण गाव खेड्यातील, अती दुर्गम भागातील म्हणून आपण काहीच करू शकत नाही. असे विचार न करता सकारात्मक कल्पनांना ऊर्जा देण्याची गरज त्यावेळी डॉ खोब्रागडे यांनी व्यक्त केली. सुरुवातीचे शिक्षण आपण तुमसर शहरातूनच पूर्ण केले. त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना देखील तीच संधी मिळावी म्हणून नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची हमी देखील खोब्रागडे यांनी दिली.
समाजाला परतफेड करण्याचे हेच अंतिम मार्ग
अंजनाबाई चॅरिटेबल ट्रस्ट विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरीता नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. त्यातून अनेकांचे पालकत्व स्वीकारून आपण समाजाला परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक पिढ्या त्यातून घडल्या, अनेक युवक सरकारी क्षेत्रात लागले आहेत. याचे ट्रस्टचे व्यवस्थापक म्हणून आनंद असल्याची भावना आपल्या अध्यक्षीय भाषणातून पडोळे यांनी व्यक्त केली.