
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर : माणुसकीला काळिमा फासणारी, अंतःकरण हादरवून टाकणारी घटना माकडे नगर येथून समोर आली आहे. गल्ली क्रमांक १४ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने, विजय घनश्याम तिबुडे याने, एका निरागस कुत्र्याच्या पिल्लावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना १९ एप्रिल रोजी सकाळी सुमार ६ वाजता घडली. या अमानुष कृत्यात त्या पिल्ल्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन ते हालचाल करण्यासही असमर्थ झाले आहे.
जगात ज्यांना बोलता येत नाही, आपल्या वेदना सांगता येत नाहीत, अशा मुक्या जीवावर इतक्या क्रूरतेने हात उगारणं ही माणुसकीची घोर अध:पाताची पातळी आहे. या आधी देखील संबंधित व्यक्तीने कुत्र्यांवर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची नोंद आहे.
या क्रूरतेविरोधात आवाज उठवत प्राणीमित्र अनिल कारेमोरे यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११ व BNS कलम ३२५ अंतर्गत संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर दूधकवरे करत आहेत.
या घटनेमुळे प्राणीप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. स्थानिकांनीही अशी क्रूरता थांबवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“मूक जीव बोलत नाही, पण वेदना त्यांनाही होतात… त्या वेदनांचा आवाज आता समाजाने ऐकला पाहिजे!”





Total Users : 883239
Total views : 6488711
