
तुमसर: शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे गुरुपौर्णिमेच्या औचित्याने “गुरूंना अभिवादन” या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रीती भोयर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षक वृंदांना सन्मानपूर्वक भेटवस्तू देत आदरांजली अर्पण केली. यानंतर समर्थ बांते , श्रावणी मोहतुरे,हनी पटले,पंखुडी मलेवार, अंतरा मेश्राम,गुंजन कामथे, लिझा हेडाऊ या विद्यार्थ्यानी “गुरूची महती” विषयावर भावनिक आणि प्रेरणादायी विचार भाषणातून मांडले.
“आजच्या काळात शिक्षकांनी विज्ञानवादी दृष्टीकोन अंगीकारणे आवश्यक आहे. अध्यापनापेक्षा मूल्यशिक्षण आणि सृजनशीलता विकसित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘का?’ आणि ‘कसे?’ असे प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना जशी तळमळ आपल्या स्वतःच्या पाल्यांसाठी असते, तशीच तळमळ विद्यार्थ्यांसाठीही ठेवावी. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमधून देशाचे खरे शिल्पकार घडतील आणि भारत महासत्ता बनेल.”असे प्रांजळ मत मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.ते ” गुरूंना अभिवादन” या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाचे संचालन माही मेश्राम तर आभार सृष्टी धावडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला ज्योती बावनकर, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के, रूपराम हरडे, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, झनकेश्वरी सोनवाणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गुरुपौर्णिमा निमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.





Total Users : 883186
Total views : 6488654
