
इंजोरी: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणांचे दर्शन घडवले. याच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते गावाचे सुपुत्र आणि समाजसेवक श्री लायकराम भाऊ भेंडारकर यांनी. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने उपस्थित ग्रामस्थांच्या मनात नवीन ऊर्जा व प्रेरणेचा संचार झाला.
कार्यक्रमात बोलताना श्री भेंडारकर यांनी आपल्या गावाविषयीची जिव्हाळ्याची भावना व्यक्त करत म्हटले, “मी कितीही मोठ्या पदावर गेलो, तरी माझी नाळ गावाशीच जोडलेली आहे. कोणत्याही सामाजिक उपक्रमाची सुरुवात मी माझ्या गावातून, आणि त्या गावाच्या शाळेतूनच करतो.” या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, गावातील युवकांनी स्पर्धा परीक्षा, शिक्षण व अन्य क्षेत्रांत पुढे यावे, यासाठी प्रत्येकाने जिद्द व चिकाटीने प्रयत्न करावे. “आज माझ्या गावाची हीच शाळा ‘अटल क्रीडा महोत्सवा’मध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे, याचा मला अत्यंत अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त
आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना श्री भेंडारकर म्हणाले की, “माझे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. माझ्या दोन्ही गुरुजी कौतुकास पात्र आहेत. आज या शाळेचा व गावाचा विकास त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला आहे.” गावातील लोकांचा शिक्षकांवर असलेला विश्वास हेच यशाचे गमक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रविंद्र खोटेले माजी सरपंच,मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रुपाली मेंढे उपाध्यक्षा शा. व्य. स, डाकराम मेंढे पोलीस पाटील, दिलीप हूकरे, सतीश शिवणकर,गायत्री मेंढे, दीपिका रहिले, मोनाली मेंढे, दिक्षा शेंडे, विद्या तरोने, अमिता बोंद्रे,रागिणी भेंडारकर, उषा खोटेले,अश्विनी तरोने, नितीन हुकरे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठोबा रोकडे यांनी केले.
तसेच सुत्रसंचालनाची जबाबदारी सहाय्यक शिक्षक लाखेश्वर लंजे यांनी उत्तमपणे पार पाडली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, गीत आणि अभिनय याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करताच, ग्रामस्थांमध्येही अभिमानाची भावना जागृत केली. एकूणच, श्री लायकराम भाऊ भेंडारकर यांचे गावाशी असलेले नातं, त्यांची नम्रता आणि समाजासाठी असलेली बांधिलकी हे नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अशा नेतृत्वातूनच ग्रामीण भागाचा खरा विकास घडू शकतो.





Total Users : 883092
Total views : 6488527
