
पुरुष गट प्रथम पारितोषिक – एचएफ डिलक्स दुचाकी, महिला गट प्रथम पारितोषिक – इलेक्ट्रिक स्कूटी व अनेक रोख इनामे, चांदीची गदा व मानचिन्हे.
नगरधन :- रामटेक तालुक्यातील चिचाळा गाव कुस्तीप्रेमींसाठी 2 नोव्हेंबरला एक ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहे. पारंपरिक मातीच्या कुस्तीला नवे बळ देण्यासाठी न्यू पवनसुत तालीम संघ, चिचाळा यांच्या वतीने विदर्भातील सर्वात मोठा भव्य इनामी कुस्ती आमदंगल आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक मीताराम दमाहे, राजहंस माहुले, देवलाल दमाहे, संजय दमाहे, भद्दू बंधाटे, दीक्षित दमाहे, साहिल नरेंद्र बंधाटे, सुरेश बंधाटे तसेच समस्त चिचाळा ग्रामवासी असून, संपूर्ण चिचाळा गाव या सोहळ्याच्या तयारीत रंगले आहे. या आमदंगलीत महाराष्ट्रासह देशातील नामांकित आणि दिग्गज पैलवान सहभागी होणार असुन दमदार झुंजी आणि कौशल्यपूर्ण डावपेच यांचा मेळ या मैदानावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कुस्तीच्या या रंगतदार मेजवानीत विदर्भातील कुस्तीचा झेंडा पुन्हा फडकवण्याचा निर्धार न्यू पवनसुत तालीम संघ, चीचाळा व आयोजकांनी केला आहे. या कुस्ती स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक इनामे ठेवण्यात आले आहेत — पवनसुत केसरी (पुरुष गट) : प्रथम पारितोषिक — एचएफ डिलक्स दुचाकी तसेच राणी अवंतीबाई लोधी केसरी (महिला गट) : प्रथम पारितोषिक — इलेक्ट्रिक स्कूटी याशिवाय विजेत्या व उपविजेत्या पैलवानांसाठी इतर अनेक रोख इनामे, चांदीची गदा व मानचिन्हेही देण्यात येणार आहेत. अशी माहिती आयोजक मिताराम दमाहे यांनी दिली आहे.
चिचाळा गावात सर्वत्र उत्सवी वातावरण आहे. गावातील महिला, युवक मंडळी आणि तालीम संघाचे सदस्य मिळून होणाऱ्या कुस्तीचे मैदान सजविण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. कुस्ती हा आपला पारंपरिक वारसा आहे. या स्पर्धेतून तरुण पिढीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आयोजक मीताराम दमाहे यांनी सांगितले.
2 नोव्हेंबर हा दिवस विदर्भातील कुस्तीप्रेमींसाठी महत्वाचा असुन या आमदंगलीत सहभागी होऊन स्थानिक व बाहेरील आलेल्या पैलवानांना प्रेरणा आणि पाठबळ द्यावे, असे आवाहन न्यू पवनसुत तालीम संघ, चिचाळा तर्फे करण्यात आले आहे. चिचाळा हे 2 नोव्हेंबर रोजी विदर्भातील कुस्तीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, हे मात्र निश्चित!






Total Users : 883054
Total views : 6488485
