
तिरोडा: महाराष्ट्र राज्यात 6 व्याघ्र प्रकल्प असून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात असून राज्यातील नावाजलेले व्याघ्र प्रकल्प आहे. याचे बफर क्षेत्र 2017 साली जाहीर झालेले असून राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापन संरचनेनुसार या व्याघ्रप्रकल्पाचे प्रशासकीय व्यवस्थापनाचे एकत्रीकरण झाले नसल्याने बफर क्षेत्राचे व्यवस्थापन हे प्रादेशिक आणि FDCM विभागाकडे होते. त्यात सुधारणा करण्यासाठी या क्षेत्रासाठी ज्यापद्धतीने बर्याच भागात प्रशासन सुधारणेसाठी नवीन तालुके निर्मितीची मागणी होत असते त्याचतत्त्वाने बफर क्षेत्रात नवीन वनपरिक्षेत्र तयार करण्यात येत आहेत.
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पासारखे उपजीविका, रोजगार निर्मिती प्रकल्प अतिशय कमी प्रमाणात आहेत. मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला असून त्याचे नियंत्रण होणेसाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. जेणेकरून जनतेत शासनाबाबत रोष कमी निर्माण होईल. सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहेत. यात वाढ होत असल्याचे समोर येत आहेत. सदर परिसरात त्यामुळे व्यवस्थापनात सुधारणा आवश्यक आहे. याबाबत संघर्ष हाताळण्यासाठी प्रशासकीय सुधारणा करत क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या वाढवली जाणार आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीची प्रकरणे, पाळीव पशुच्या जखमी किंवा मृत्यू होण्याची प्रकरणे तात्काळ मंजूर होण्यासाठी नव्याने तिरोडा, साकोली आणि नवेगाव बांध या ठिकाणी सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग (अ) दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांना भंडारा किंवा गोंदिया येथे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. तालुका स्तरावर त्यांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल. यामुळे बफर क्षेत्रातील स्थानिकांना फायदाच होणार आहे.
ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटन आणि इतर संबंधित प्रकल्पातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे येथील स्थानिक लोकांच्या रोजगार संधी पर्यटनाच्या माध्यमातून वाढवणे अपेक्षित आहे. बफर क्षेत्र तत्काळ व्याघ्र प्रकल्पाकडे देऊन नवीन पर्यटन प्रकल्प, सफारी गेट सुरू केल्यास स्थानिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. काही घटक स्थानिकांना कुपकटाई, तेंदूपाने, मोहफुले यातील रोजगार बंद होण्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. मात्र व्यवस्थापन सुधारणेमुळे यावर कोणतीही बंदी येत नाही. केंद्र शासन आणि राज्य शासन मार्फत मंजूर आराखड्यानुसार वरील कामे नियमानुसार सुरूच राहतील आणि त्यामुळे त्यातील रोजगार संधी कायमच राहतील.
स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनात सुधारणा आणि नागरिकांना रोजगार संधी वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प राबवण्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे निश्चितच मानव वन्यजीव संघर्ष कमी होणे आणि पर्यटन संधी वाढणे अश्या दोन्ही गोष्टी घडून येतील आणि स्थानिकांनाच त्याचा लाभ होईल..





Total Users : 880445
Total views : 6484690