
नागपूर. भंडारा शहरासाठी ५८ कोटी रुपये खर्चुन मंजूर करण्यात आलेली वाढीव पाणीपुरवठा योजना मागील ६ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवत्याचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या एका भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तर काही भागात पाण्याची नासाडी होत आहे, याकडे आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्ष वेधत रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भंडारा शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून, १०,५७० नळधारकांना आजही अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. शहरातील जुन्या आणि कालबाह्य पाईपलाईन नाल्यांतून गेल्याने अनेकदा नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे, ज्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरासाठी ५८ कोटी रुपये खर्चुन मंजूर करण्यात आलेली वाढीव पाणीपुरवठा योजना मागील ६ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे.
वास्तविक, या योजनेचे काम दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे काम अद्यापही प्रलंबित आहे. सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे, तर दुसरीकडे नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. शासनाला त्वरित निर्देश द्यावेत की, भंडारा शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून गती देण्यात यावी आणि नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी परिषदेचे सभापती यांच्याकडे केली.




Total Users : 880152
Total views : 6484222