
तुमसर: तालुक्यातील खापा ते हसारा या मार्गावर छाव्यासह वाघीण दिसल्याची चर्चा आणि त्यानंतर नागरिकांची वाघ पाहण्यासाठी झालेली गर्दी ३१ रोजी चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, तो वाघ नसून रानमांजर होते, असा खुलासा वनविभागाने गस्तीनंतर केला आहे. अफवा पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
वाघ दिसल्याचे सांगून ३१ जानेवारी रोजी समाजमाध्यमांवर छायाचित्र आणि चित्रफिती प्रसारित करण्यात आल्या. या चित्रफिती पाहून हसारा ते खापा मार्गावरील शेतशिवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली. मात्र, रात्री उशिरा वनविभागाने तो वाघ नसून रानमांजर असल्याचे स्पष्ट केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता ही बाब उघडकीस आली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी या भागात गस्त घातली. मात्र, अखेर ही केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिक विनाकारण चुकीची छायाचित्रे टाकून भीती निर्माण करतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. खरोखरच वन्यप्राणी आढळल्यास आधी वनविभागाला माहिती द्यावी. कुणीही परस्पर छायाचित्र किंवा चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करून अफवा पसरवू नये. असे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले यांनी इंडियन हेडलाइन न्यूज़ शी बोलताना सांगितले.





Total Users : 883068
Total views : 6488500
