![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
भंडारा :मणिपुरात घडलेली घटना निंदनीय आणि दु:खदायकही आहेच. या घटनेची सरकारलाही चिंता आहे. या घटनेप्रति सरकार संवेदनशील असतानाही विरोधक मात्र या घटनेच्या नावाखाली निव्वळ राजकारण करत आहेत. राजकारण करण्याचा हा विषय नाही, हे सर्वांनी समजून घ्यावे, असे प्रतिपादन खासदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले.
भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येथील विश्रामगृहावर थांबले असता पत्रकारांशी केलेल्या वार्तालापादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, मणिपुरातील घटनेच्या पाहणीसाठी गृहमंत्र्यांनी तिथे दौरा केला. तेथील समस्या समजून घेतली. वेळेची चिंता न करता सभागृहात या विषयावर पूर्ण वेळ चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. तरीही विरोधक या घटनेवर राजकारण करीत आहेत. तेथील समस्या आणि प्रश्न वेगळे आहेत, हे विरोधकांनी आधी समजून घ्यावे.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांना मिळालेली नोटीस हा प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी या घडामोडीवर अधिक बोलणे टाळले. राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित १२ आमदारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून कॅबिनेटच्या शिफारशीनंतर मंजुरी मिळेल, असे सांगून त्यांनी स्थानिक नेत्यांच्या नावांबद्दल सुरू असलेल्या चर्चेला तूर्तास अर्धविराम दिला.
राज्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एनडीएसोबत
देशाला आज सक्षम सरकारची गरज आहे. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एनडीएचे घटक म्हणून आम्ही काम करू, जबाबदारी पार पाडू, असे ते म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर शिंदे मुख्यमंत्री पदावर आहेत, असे सांगून त्यांनी प्रश्न टोलावला.