![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार
भंडारा: रस्त्यांची दुरावस्था हा नवीन विषय नाही. परंतु ती दुरावस्था किती असावी, याचे काहीतरी तारतम्य संबंधित विभागाने पाहायला हवे. भंडारा तुमसर मार्गाने दुरावस्थेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. या रस्त्यावर खड्डे नाही तर खड्ड्यांचे विशाल असे रूप पाहायला मिळते. यम सदनी पोहोचविणारा मार्ग असे वर्णन केल्यास अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
भंडारा तुमसर हा राज्यमार्ग आता भंडारा बालाघाट असा महामार्ग झाला आहे. राज्य मार्गाचा महामार्ग झाला मात्र दर्जा गावातल्या रस्त्यांपेक्षाही रद्दी आहे. एरवी खड्ड्यांना शिव्यांची लाखोली वाहत लोक कसाबसा प्रवास करून घेतात. मात्र पावसाळ्यात जो या खड्ड्यात पडला तो पसरला एवढे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे सध्या या मार्गावरील खड्डे सर्वांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. रस्त्याने जाताना खड्ड्यातूनच जावे लागते. कधी कधी तू चांगला रस्ता वाहनांच्या नशिबाला येतो. छोटे मोठे खड्डे असतील तर त्याचे काही नाही मात्र अवाढव्य असे खड्डे लोकांच्या लुळे पांगळ्या होण्याची प्रसंगी जीव गमावण्याची वाट पाहत आहेत की काय असा प्रश्न पडतो. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी वाहन चालकांना अचूक अंदाज घेऊ देत नाही आणि न चुकता वाहन चालक खड्ड्यात जाऊन पडतो. आतापर्यंत अनेक अपघात या मार्गावर झाले आहेत. दुचाकींचे सोडाच चार चाकी गाड्याही या खड्ड्यांमध्ये आढळल्यानंतर जखमी झाल्याशिवाय राहत नाहीत.
या खड्ड्याने अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी एवढेच काय तर प्रमुख अधिकारीही प्रवास करतात. खड्डामय झालेला हा रस्ता त्यातच अरुंदही आहे. या सर्व कसोट्या पार करून रस्त्यावरून जाणे दिव्य झाले असून मार्गाने जाणारा प्रत्येक जण या खड्ड्यांच्या नावाने लाखोली वाहताना दिसतो. एकीकडे गुळगुळीत रस्ते करण्यावर आमचा भर आहे तर दुसरीकडे डबके तयार व्हावीत असे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. हे खड्डे वाहन चालकांना यमाच्या घरी पोहोचविण्यास उत्सुक असल्याचे त्यांच्या अवाढव्य रूपावरून वाटते. लोक घाबरली आहे मात्र प्रशासन बिनधास्त आहे. महामार्ग प्राधिकरणाकडे सध्या हा मार्ग आहे.
रस्त्याची वास्तविकता सर्वांनाच माहिती आहे. खड्ड्यांची डागडुजी करण्याचे सौजन्य कुणालाही दाखवायचे नाही. अपघात झाल्यानंतर किंवा कुणाच्या जीवावर घेतल्यानंतर आश्वासन देऊन लाख रुपये मदतीचा धनादेश देण्याची तयारी ठेवणाऱ्या प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ही वेळ येऊच नये यासाठी प्रयत्न केल्यास कदाचित लोकांचे जीव वाचू शकतील. नाहीतर खड्डे “खड्ड्यात” घालणार हे नक्की. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यावरून संभाव्य अपघाताच्या भीषणतेची कल्पना येत नसेल तर मात्र सरकारी यंत्रणा खरंच सरकारी आहे, स्पष्ट होईल.
…..