![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
जिल्हा परिषदेच्या निधीची वाटणी नको : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले
प्रतिनिधी / गोंदिया : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीवर जिल्हा परिषदेचा अधिकार, वाटणी नको अशी स्पष्ट भूमिका जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नवनियुक्त पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या समोर गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी घेतली. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रकिया सुरु करुन जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान द्यावे अशी मागणी केली. जिल्हा नियोजन समितीमध्ये 20 जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश अध्यक्ष वगळता असतो. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी लोटत असतानाही जि.प.सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत सामावून घेण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे असा सवाल देखील पंकज रहांगडाले यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषदेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बनगाव, घाटकुरोडा, रामपुरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध या पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी प्राप्त होणे बंद झाल्यामुळे सदर योजना चालवण्यास जिल्हा परिषदेला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखभाल दुरुस्ती अंतर्गत चार कोटी रुपयांची मागणी पालकमंत्री आत्राम यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केली. सोबतच पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 3054/5054 योजनेंतर्गतच्या निधीबाबत 40 टक्के जिल्हा परिषद, 40 टक्के आमदार व 20 टक्के पालकमंत्री याप्रमाणे वाटप करुन नियोजन करावे अशी सुचना करताच जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी निधीवर जिल्हा परिषदेचा हक्क असून या योजनेच्या निधीचे कामाचे नियोजन पुर्णतःजिल्हा परिषदेला करु द्यावे अशी रोखठोक भूमिका घेतली.