![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात सुप्रसिद्ध गायिका भीमकन्या कडूबाई खरात यांनी आपल्या सुमधुर आणि हृदयस्पर्शी गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. रमाई महिला मंडळ सार्वजनिक उत्सव समिती, आंबेडकर व कुंभारे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम रविवार, ९ फेब्रुवारी रोजी नेहरू पाटांगणावर आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण वातावरण भीममय झाले होते. “मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी,” “भीम माझा गं दिल्लीत भाषण देई,” आणि “होता तो बापाचा बाप, माझा भीमराव आंबेडकर” यांसारख्या हृदयाला भिडणाऱ्या भीमगीतांच्या सुरावटांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यांच्या गाण्यांवर टाळ्यांचा गजर आणि “जय भीम!” च्या जयघोषात संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.
कार्यक्रमात महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. रमाईच्या संघर्षाचा गौरव करत, अनेकांनी बाबासाहेब आणि रमाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला. विशेषतः तरुणांनी भीमगीतांवर ताल धरत उत्स्फूर्त घोषणा देत “बाबासाहेबांचे उपकार आम्ही विसरणार नाही!” असा दृढ संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सविता नंदागवळी, सविता बोंबार्डे (अध्यक्षा – रियांशी महिला नागरी सहकारी पतसंस्था, तुमसर), प्रभा खोब्रागडे, पंचशीला शेंडे, त्रिशीला भरनेकर, उषा रामटेके, सुरेखा मेश्राम आणि गीता बोरकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संपूर्ण शहराने एक अभूतपूर्व भीममय सोहळा अनुभवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू कारेमोरे होते, तर उद्घाटन संकेत मुरकुटे (उद्योजक, नागपूर) यांच्या हस्ते झाले. या वेळी यासीन छवारे, प्रदीप भरणेकर, आयोजक आशिष गजभिये, नवनाथ मेश्राम, अश्विन जगने तसेच पत्रकार आणि रमाई महिला मंडळाच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. हा संगीतमय सोहळा प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला, ज्याने संपूर्ण शहर भीममय करून टाकले.