
तुमसर( भंडारा) : शहरातील आंबेडकर नगर (आंबा टोली) भागात बुधवारी दुपारी एक युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख रोशन प्रकाश वासनिक (वय ३५) अशी असून तो अविवाहित होता.मिळालेल्या माहितीनुसार, रोशन हा गेल्या काही वर्षांपासून मद्यपानाच्या आहारी गेला होता. बुधवारी त्याचा माकडे नगर येथील लारा किरण मारबते (वय २८) याच्याशी किरकोळ वाद झाला होता. वादाचे रूपांतर काही वेळातच झटापटीत झाल्याची माहिती स्थानिकांकडून पुढे आली असून, त्यामध्ये लाराने रोशनच्या पोटावर लाठीयुक्त मारहाण केल्याचा आरोप आहे.या घटनेनंतर काही तासांतच रोशनचा मृतदेह घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, जिल्हा गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन चिंचोळकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सयाम तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, आरोपी लारा मारबते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरण हत्या आहे की अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू, यावर अजून स्पष्टता आलेली नसून, या संदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपासात व्यस्त असून, उत्तरीय तपासणी अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





Total Users : 883186
Total views : 6488654
