
तुमसर: नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये सांडपाणी निचऱ्याची एकमेव जागा बंद झाल्याने परिसरात सांडपाणी साचत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक पिपरा रोड वर आईटी कॉलोनी ले-आऊटच्या मालकाने सांडपाणी जाणाऱ्या नैसर्गिक मार्गावर वॉल कंपाऊंड उभारल्याने संपूर्ण प्रभागातील घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सांडपाणी रस्त्यावर व वस्तीमध्ये साचून राहिल्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हा वॉल कंपाऊंड उभारताना नगर परिषद प्रशासनाने परवानगी दिलीच कशी? असा थेट सवाल उपस्थित होत असून, प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैशाली भवसागर यांनी थेट नगराध्यक्षांना निवेदन देऊन करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अजून पर्यंत ना मुख्याधिकारी ना अभियंता ने साधी भेट दिली. येथील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून, सांडपाण्यामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असून, वेळेत उपाययोजना न केल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणावर नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते, सांडपाणी निचऱ्याचा मार्ग पूर्ववत केला जातो का, तसेच दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





Total Users : 895442
Total views : 6505858
