
तुमसर : जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या आयोजित जनता दरबारात विधानसभेतील अनेक महत्त्वाचे विषय हाताळण्यात आले. त्यात तुमसर नगर पालकेत संवर्ग निहाय रिक्त असलेल्या पदांचा मुद्दा पालिकेचे उपाध्यक्ष सचिन बोपचे यांनी उपस्थित केला. त्यावर सविस्तर चर्चा करून ती २१ रिक्त पदे तात्काळ भरून घेण्यावर पालक मंत्र्यांनी शिक्का मोर्तब केला आहे. लवकरच त्यावर स्वंतत्र बैठक घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन भोयर यांनी दिले आहे. बोपचे यांनी निवेदनात नमूद केलेल्या रिक्त पदांमध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवेच्या स्थापत्य, विद्युत, संगणक, स्वच्छ्ता, लेखा परीक्षक, लेखापाल, कर निर्धारक, अग्निशमक सेवा, नगर रचनाकार आणि विकास सेवा अश्या एकूण ९ संवर्गातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे तब्बल २१ पदे रिक्त असून फक्त ७ जागा भरल्याची खंत बोपचे यांनी त्यावेळी व्यक्त केली, हे विशेष!
अतिरिक्त कारभाराचा ताण – शहर आणि समस्या यावर विचार करून समाधान करणाऱ्या २८ अधिकाऱ्यांची यंत्रणा तुमसर पालिकेला मान्य आहे. मात्र बहुतांश पदे रिक्त असल्याने तश्या अधिकाऱ्यांचे अतिरिक्त कारभार स्थायी कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागतो. त्यामुळे शहराचा विकास खुंटतो. सदर समस्या तत्काळ मार्गी लावण्यावर भोयर यांनी त्यावेळी शब्द दिला.
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा– पालक मंत्र्यांना सचिन बोपचे यांनी त्यावेळी शहरातील पाणी पुरवठा योजना, झोपडपट्टी भागातील अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप, शहराची हद्द वाढ व त्यातून विकासाचा बहुआयामी आराखडा, प्रभावित भागात अंगणवाडी तसेच शहरातील इतर महत्त्वकांक्षी योजनांवर चर्चा केली. सर्व विषय मंत्र्यांनी गांभीर्याने घेत बोपचे यांनी उपस्थित केलेल्या विषयांचे कौतुक केले, हे विशेष!





Total Users : 895441
Total views : 6505855
