
दत्तोरा : जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, दत्तोरा येथील माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांनी आपल्या मातृशाळेबद्दलची कृतज्ञता जपत शाळेला विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची रोपे सप्रेम भेट दिली. शाळेचा परिसर अधिक हिरवागार, सुंदर आणि पर्यावरणपूरक व्हावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने गौरव बिसेन यांनी हा उपक्रम राबविला. शाळेच्या परिसरात या रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शाळेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. “ज्या शाळेने आपल्याला शिक्षण आणि संस्कार दिले, त्या शाळेसाठी आपल्या परीने काहीतरी योगदान देणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची जबाबदारी आहे,” अशी भावना माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजण्यास मदत होणार असून, शाळेचा परिसर भविष्यात अधिक हिरवागार होण्यास हातभार लागणार आहे. माजी विद्यार्थ्याने शाळेसाठी पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्या या स्तुत्य उपक्रमातून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश विद्यार्थ्यांसह समाजापर्यंत पोहोचला आहे.





Total Users : 895441
Total views : 6505855
