
भंडारा : “अडथळे शरीरात नसतात, ते विचारांमध्ये असतात,” हेच जणू सिद्ध करणारी भंडारा जिल्ह्यातील दिव्यांगाची जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र वितरणाने आनंदोत्सवात संपन्न झाली. दिव्यांग विभाग, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण, जि. प.भंडारा, व समाज कल्याण विभाग जि. प. भंडारा च्या संयुक्त विद्यमानाने येथील शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे दी. १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवे बळ मिळाले. समारोपीय कार्यक्रमात यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा गौरव करण्याकरिता जिल्हा सक्षमिकरण अधिकारी कवीश्वर खोब्रागडे, वित्त विभागाचे अश्विन वाहने, अजय कानतोडे, सामाजिक न्याय विभागाचे शिवशंकर खोब्रागडे , निलेश गाढवे, नितीन मोहतुरे,विनोद उमप,तनुजा नेपाळे, राजेंद्र वाघाळे, प्रमोद सोनकुसरे, रमेश चकोले, संजय घोडके, गणेश मेहर, विनायक पाथोडे , रत्नाकर शहारे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली . दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धे दरम्यान
क्रीडांगणावर उतरलेली पावले जिद्दीची, तर रंगमंचावर उमटलेली नृत्यविष्काराची पावले ही दिव्यांगाना आत्मविश्वासाची साक्ष देणारी ठरली. दिव्यांग स्पर्धकांनी दाखवलेली ऊर्जा, शिस्त आणि समर्पण पाहून उपस्थितांच्या मनात प्रेरणेचा नवा अंकुर रुजला. विशेष म्हणजे सादर झालेली सांस्कृतिक स्पर्धेत सादर केलेली नृत्ये केवळ मनोरंजन नव्हती, तर ‘आम्ही सक्षम आहोत’ असा ठाम संदेश देणारी होती. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले. शिक्षक, पालक व आयोजक समाज कल्याण विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत “योग्य संधी दिल्यास दिव्यांग विद्यार्थीही समाजाचे नेतृत्व करू शकतात,” हा विश्वास अधिक दृढ केला. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्री, संघभावना आणि आत्मनिर्भरतेची भावना अधिक प्रबळ झाली.
भंडारा जिल्ह्यातील ही स्पर्धा केवळ कार्यक्रम न राहता, आशा, उमेद आणि नव्या प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा , कर्मशाळेच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.





Total Users : 895442
Total views : 6505858
