
तुमसर : प्रतिनिधी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींची सुरक्षितता, स्वावलंबन आणि आत्मविश्वास वाढविणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने “लेक लाडकी आई बाबांची” व जे.सी.आय.कुबेर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता U.S.A. विद्यानिकेतन , तुमसर येथील हॉल मध्ये “पोऱी जरा जपून” या विषयावर विशेष प्रेरणादायी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या प्राचार्या सौ. विजयाताई मारोतकर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार असून त्या मुलींच्या सुरक्षिततेबरोबरच आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची जाणीव, स्वावलंबन आणि सामाजिक जागरूकतेबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडणार आहेत. आजच्या काळात मुलींनी शिक्षणासोबतच स्वतःची जाणीव आणि धैर्यही वाढविणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम विशेषतः मुलींच्या हिताचा विचार करून आयोजित करण्यात आला असून विद्यार्थिनींना जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तुमसर परिसरातील सर्व शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच तरुण-तरुणींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात सेव डॉटर फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल गभने, सचिव अनिल कारेमोरे आणि कोषाध्यक्ष अनिल निखाडे यांनी सांगितले की, मुलींच्या सशक्तीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनींना या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी शाळांनीही विद्यार्थिनींना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. दरम्यान, मुली सक्षम, सजग आणि आत्मविश्वासपूर्ण बनल्या तर समाजही अधिक सुरक्षित आणि प्रगत होतो, या विश्वासातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम तुमसर परिसरात नवी प्रेरणा देणारा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





Total Users : 895442
Total views : 6505858
