
तुमसर पतिनिधि/ भंडारा येथे महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाने व महिला मोर्चाने काँग्रेसच्या भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन छेडले. शहरातील जे. एम.पटेल महाविद्यालय ते त्रिमूर्ती चौक परिसरात आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी युवकांनी महिलांनी फलक, बॅनर हातात घेत “महिलांना समान हक्क द्या”, “महिला सक्षमीकरण हाच खरा विकास” अशा घोषणा देत वातावरण भारावून टाकले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी मिळावी यासाठी हे विधेयक अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिलांचा व युवकांचा सहभाग दिसून आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. महिलांच्या हक्कांसाठी पुढेही अशाच तीव्र आंदोलनांची मालिका सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला.





Total Users : 895442
Total views : 6505857
