
इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क: उप कार्यकारी अभियंता, महावितरण यांची भेट घेऊन पवनी शहरात स्वतंत्र 132/33 के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र (Sub Station) उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले, पवनी हे भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे मुख्यालय असून शहरासह परिसरातील सुमारे ४५ गावांचा विद्युत पुरवठा सध्या गोसे धरण परिसरातील 132/33 के.व्ही. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रावर अवलंबून आहे. हे उपकेंद्र पवनीपासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर असल्यामुळे वादळ, पाऊस, नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास पवनी शहरासह संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो.
या परिस्थितीचा थेट परिणाम पवनी शहरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी लघुउद्योग तसेच शासकीय कार्यालयांवर होत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा व पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पवनी शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिक व व्यावसायिक विस्तार तसेच भविष्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र 132/33 के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र (Sub Station) उभारणे ही अत्यावश्यक बाब असून ती काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पवनी शहरात स्वतंत्र 132/33 के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण करून वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा. तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा,
पवनी शहर व परिसरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, ही विनंती करण्यात आली.: डॉ सौ विजया राजेश नंदुरकर ठाकरे नगराध्यक्ष नगर परिषद पवनी





Total Users : 895441
Total views : 6505855
